भाविना पटेलची रौप्यक्रांती

पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक
टोकियो | वृत्तसंस्था |
टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक जिंकून देत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनामुळे भारताला पदक मिळाले आहे. भाविनाबेन पटेलने टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले आहे.
टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले वहिले पदक आहे. भाविनाचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र अंतिम सामन्यात चीनच्या यिंगनंने तिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यिंगने विजेते पदाच्या लढतीत भाविनाबेनचा 3-0 ने पराभव केला. परंतु, टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भाविना ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. रौप्यपदकापर्यंत गवसणी घालणार्‍या भाविनाबेनने सार्‍या भारतीयांची मने जिंकली आहेत.
एक वर्षाची असताना अर्धांगवायू
पॅरा खेळाडू भाविनाबेन पटेल एक वर्षांची असताना चालण्याचा प्रयत्न करताना पडली, त्यावेळी तिच्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता. परंतु, काही कालावधीनंतर तिच्या दुसरा पायालाही अर्धांगवायू झाला. त्यानंतर संगणक शिकत असताना तिला टेबल टेनिस खेळण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून अभिनंदन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदक जिंकल्याबद्दल भाविनाबेन पटेल यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, भाविनाबेन पटेल यांनी इतिहास घडवला आहे. त्यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांना खेळाकडे आकर्षित केले जाईल.

Exit mobile version