| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये सोमवारी सकाळी भटक्या कुत्र्यांनी केेलेल्या हल्ल्यात एक भेकराचा मृत्यू झाला. शास्त्री हॉल येथे सकाळच्या सुमारास कळपातुन भटकलेले भेकर भर वस्तीत येऊन स्वैराचार करीत असताना 4 ते 5 भटक्या कुत्र्यानी एका भेकरावर हल्ला केला. त्याची सुटका करण्यासाठी सफाई कामगारा तसेच उपस्थित नागरीकांनी शर्तीचे प्रयत्न केलेत, मात्र सदर परिसरात जाळीचे कपांऊड असल्याने त्यामध्ये हे भेकर अडकले त्यावर हल्ला करीत श्वानांनी त्याचे लचके तोडले. या भेकराच्या पोटाला व मानेला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहीती वनविभागाला मिळाताच घटनास्थळी धाव घेत पनवेलचे सहाय्यक वनसंरक्षक वाघमोडे, माथेरानचे परीवनक्षेत्र अधिकारी उमेश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानचे वनपाल आर. जी.आडे वनरक्षक ए. एन.भांगे, डी.आर. आदेवाड तसेच पी.एम. कडु यांनी घटनास्थळावर या मृत भेकराचा पंचनामा केला. यावेळी वनविभाग कार्यालयाच्या परीसरात शवविच्छेदन करण्यात आले यानंतर मृत भेकरावर अंत्यसंस्कार करुन विल्हेवाट लावण्यात आली.