भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम निकृष्ट

स्थानिक नागरिक संतप्त

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील भेरव आवंढे खांडपोली कामथेकर वाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, सुरुवातीलाच रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने स्थानिकांनी कामाबाबत नाराजी व्यक्त केली.

भेरव खांडपोली ते कामथेकरवाडी मार्गांचे काम हे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अलिबाग यांच्या अखत्यारित येत असून, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता हा 4.450 कि.मी. लांबीचा असून, 318.29 लक्ष इतका निधी या रस्त्याकरिता उपलब्ध करण्यात आला आहे. भेरव खांडपोली ते आवंढे या मार्गाचे काम सुरुवातीपासून निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यात जुन्या मोर्‍या काढून त्याठिकाणी नवीन मोर्‍या टाकण्यात आल्या आहेत. मात्र इस्टिमेटमध्ये दिल्याप्रमाणे त्या मोर्‍यांखाली पीसीसी न करता तशाचा मातीत टाकण्यात आल्या आहेत. शिवाय खडीकरण झाल्यावर माती भराव करुन दबाई करण्यात आली आहे. मात्र, त्यावर पाणी मारणे बंधनकारक असूनदेखील महिन्या-पंधरा दिवसांतून एखाद्या टँकरद्वारे पाणी मारले जात आहे. या मार्गावरून अवजड व लहान वाहनांची सततची वाहतूक असल्याने रस्त्यावरील माती निघून गेली आहे. रस्त्याच्या कामातदेखील दिरंगाई होत आहे.याबाबत संबंधित अधिकारी अभियंता चंदन मोरे यांच्या सदरची बाब निदर्शनास आणूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे काम होत आहे. या मार्गाचे काम हे दर्जेदार व जलद गतीने झाले पाहिजे. टाकण्यात आलेल्या मोर्‍या पुन्हा काढून खाली काँक्रिट पीसीसी करुन त्या टाकण्यात याव्यात अन्यथा काम करू दिले जाणार नाही.

नरेश देशमुख,
स्थानिक ग्रामस्थ, आवंढे
Exit mobile version