भेरव ते कामथेकरवाडी ग्रामस्थांची वाट बिकट

संबंधित अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष

। पाली । वार्ताहर ।

गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या भेरव आवंढे कामथेकरवाडी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. पाऊस डोक्यावर असताना रस्त्याचे काम मात्र, धीम्यागतीने चालू आहे. त्यामुळे यंदा येथील ग्रामस्थांना चिखलातून प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भेरव-आवंढे-कामथेकरवाडी या रस्त्याच्या कामाला गेली काही महिन्यांपासून सुरुवात झाली असून काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याला मान्यता मिळाली असून सिद्धी विनायक कंस्ट्रक्शन कंपनीचे पोटठेकेदार आर.डी. कंस्ट्रक्शन कंपनीने काम हाती घेतले आहे. सद्यस्थितीत रस्त्यावर फक्त बीबीएम झाले असून खडी अंथरूण त्यावर मातीचा भराव करुन दबाई करण्यात आली आहे. तसेच, पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकण्यात आलेल्या मोर्‍यांची कामे देखील नुकतीच पूर्ण झाली आहेत.

भेरव ते कामथेकरवाडी हे 4 किमीचे अंतर असून काहीच दिवसांवर ठेपलेल्या पावसापूर्वी रस्त्याचे काम एवढ्या कमी अवधीत कसे पूर्ण होईल, असा प्रश्‍न येथील नागरीकांना पडला आहे.

पावसाळ्यातील प्रवास खडतर
या मार्गावर भेरव, आवंढे, खांडपोली, कामथेकरवाडी, पेडली आणि आदिवासी वाड्या वस्त्या आहेत. येथे एसटी महामंडळाच्या बसेस जात नाहीत त्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीसाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. कामानिमित्त व्यवसायासाठी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी जात असतात. विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची मानवविकास बसच्या काही फेर्‍या शाळेच्या वेळेत असतात. परंतु, आता खराब रस्त्यामुळे किंबहुना रस्ताच नसल्याने बस देखील बंद करण्यात येईल. त्यामुळे आता येथील विद्यार्थी, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्रवासी यांचा प्रवास हा येणार्‍या पावसात अतिशय खडतर बनणार हे मात्र निश्‍चित आहे.

आम्हाला प्रवासासाठी हा एकमेव मार्ग आहे. रस्त्याचे काम पावसापूर्वी झाले नाही तर पावसाळ्यात चिखलातून प्रवास करावा लागेल. आवंढे वरुन पेडलीत जाण्यासाठी मधला रस्ता आहे. मात्र, पावसाळ्यात त्यावरून पुराचे पाणी वारंवार जात असल्याने भेरव मार्गेच जावे लागते. रस्त्याचे काम अतिशय धीम्यागतीने व निकृष्ठ पद्धतीने चालू असून संबंधित अधिकार्‍यांना वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केले जाते.

नरेश देशमुख, स्थानिक आवंढे

मशनरीच्या बिघाडामुळे काम रखडले होते. खडीकरणाचे काम आज चालू होत आहे. परंतु, पावसाळ्याआधी प्रवाशांना रहदारीयोग्य व्यवस्था केली जाईल.

चंदन मोरे, कनिष्ठ अभियंता
Exit mobile version