पांचगणी | प्रतिनिधी |
पांचगणी व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या भाऊसाहेब भिलारे चषक पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुषांत भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मुंबई बंदर, आयकर यांनी, तर महिलांत शिवशक्ती, महात्मा गांधी, स्वराज्य, राजमाता जिजाऊ यांनी उपांत्य फेरीत धडक दिली.
पांचगणीच्या बाळासाहेब भिलारे क्रीडानगरीत सुरू असलेल्या पुरुषांच्या उपउपांत्य फेरीत भारत पेट्रोलीयमने रिझर्व्ह बँकेला 33-12 असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. अजिंक्य पवार, अक्षय सोनी, आदित्य शिंदे, ओमकार मोरे या विजयाचे शिल्पकार ठरले. साईराज कुंभार, जयेश यादव रिझर्व्ह बँकेकडून बरे खेळले. दुसर्या सामन्यात महिंद्राने ओमकार कुंभार, शुभम बोडके, शेखर तटकरे यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर युनियन बँकेला 26-25 असे चकविले. मध्यांतरातील 16-14 ही 2गुणांची आघाडी महिंद्राच्या कामी आली.
मुंबई बंदर संघाने मध्य रेल्वे(डिव्हिजन) संघाचा प्रतिकार 38-23 असा मोडून काढत आपली विजयी घोडदौड कायम राखली. विश्रांतीला दोन्ही संघ 17-17 अशा बरोबरीत होते.उत्तरार्धात मुंबई बंदराच्या ज्ञानेश जाधव, सोमनाथ जाधव यांनी टॉप गिअर टाकत भराभर गुण घेत संघाचा 15गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साजरा केला. मध्य रेल्वे डिव्हीजनचा पंकज चव्हाण एकाकी झुंजला. पुण्याच्या आयकरने मध्य रेल्वेचा 32-16 असा सहज पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. निलेश साळुंखे, कृष्णा मदने यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला आयकरच्या विजयाचे श्रेय जाते. गुरविंद, विराज लांडगे रेल्वेकडून बरे खेळले. महिलांच्या उपउपांत्य सामन्यात शिवशक्तीने एम.डी. स्पोर्ट्स-पुणे यांचा प्रतिकार 32-21 असा मोडून काढला. रेखा सावंतचा चढायातील झंजावाती पुणेकरांना रोखता आला नाही. तिने एकदा एकाच चढाईत 4 व एकदा 3 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. तिला चढाईत प्रणाली भुवड, तर पकडीत साक्षी रहाटे, साधना विश्वकर्मा यांची मोलाची साथ लाभली. एम.डी.च्या दिव्या सोनावणे, अनुष्का फुगे चमकल्या.
राजमाता जिजाऊने हनुमान मंडळ-बाचणी यांना 39-29 असे रोखत उपांत्य फेरी गाठली. सलोनी गजमल,मंदिरा कोमकर, ऋजुता निगडे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. शेवटच्या सामन्यात महात्मा गांधींने राजे शिवछत्रपती संस्था यांचा 22-19 असा निसटता पराभव करीत आगेकूच केली. पुरुषांत आयकर-पुणे विरुद्ध मुंबई बंदर आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध महिंद्रा यांच्यात उपांत्य लढती होतील. महिलात शिवशक्ती विरुद्ध राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य विरुद्ध महात्मा गांधी यांच्यात उपांत्य लढती होतील.