क्रांतीदिनी उसळणार भीमसागर

जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज

| अलिबाग | प्रतिनिधी |

चवदार तळे सत्याग्रहाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाखोंच्या संख्येने अनुयायी महाड येथे दाखल होणार आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 मध्ये क्रांती घडवून आणली. चवदार तळ्यातील पाणी दलितांना खुले करून दिले. त्यामुळे हा क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनुयायी महाडमध्ये येऊन चवदार तळ्याला भेट देतात. तसेच तळ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले जाते. आबालवृद्धांपासून सर्वच मंडळी महाडमध्ये दाखल होतात. बुधवारी (दि.20) मार्च रोजी महाड येथे जनसागर दाखल होणार आहे. सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाडमध्ये येणाऱ्या अनुयायींना उन्हामुळे त्रास होऊ नये, त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत, यासाठी रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाने चार पथकं तयार केली आहेत. महाड येथील वीर रेल्वे स्थानक, गांधारपाले व शहरात ही पथकं कार्यरत असणार आहेत. या परिसरात चार रुग्णवाहिका, औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 25 हून अधिक कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत. महाडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे काम केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.

Exit mobile version