भिसेगाव ते चारफाटा रस्त्याचे काम पूर्ण

आता वाहतूक कधी सुरू होणार?

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषद हद्दीमधील कर्जत चारफाटा ते भिसेगाव या 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम गेली अडीच वर्षे झाल्यावर पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून या रस्त्याचे काम आता पूर्ण झाले असून, या रस्त्यावरून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी जय अंबे रिक्षा संघटना यांच्याकडून करण्यात आली आहे.

कर्जत शहरातील भिसेगाव या रहिवाशी क्षेत्राला जोडणारा कर्जत चार फाटा येथील 400 मीटर रस्त्याचे आरसिसी काँक्रिटीकरण करण्याचे काम 2021 मध्ये मंजूर झाले होते. त्या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जून 2021 रोजी कार्यादेश संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. मात्र, ठेकेदार बांधकाम सुरू करीत नसल्याने स्थानिक रहिवासी आणि नगरसेवक यांनी उपोषण सुरू केले आणि त्यानंतर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतरदेखील रस्त्याचे काम रखडल्याने गेली दोन वर्षे रखडले होते. त्यावेळी रस्त्याचे काम व्हावे आणि या रस्त्यावरून येणारी एसटी गाडी तसेच इतर वाहनांची वाहतूक सुरू व्हावी, अशी मागणी पुढे करीत स्थानिक तरुणांनी उपोषण सुरू केले होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून या रस्त्याच्या कामासाठी साडे चार कोटींचा निधी मंजूर होता. रस्त्याचे कामाचे कार्यादेश लक्षात घेता मार्च 2023 मध्ये या रस्त्यातील साकव पूलदेखील बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यातील दुभाजकमध्ये माती टाकून झाडे लावण्यासाठी क्षुल्लक कामे पालिकेने संबंधित कामाचे ठेकेदारास सांगून त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन स्थानिक नागरिक करीत आहेत. या रस्त्याने कर्जत रेल्वे स्थानक असून, रेल्वेसाठी येणारे प्रवासी यांची वाहने दोन वर्षे या रस्त्याने येत नव्हती. रस्ता बंद असल्याने उपनगरीय लोकल पकडण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत आहे. त्याचवेळी एसटी गाड्या त्या भागातून येत नसल्याने प्रवासी संख्यादेखील कमी झाली असून, रिक्षाचालक यांनादेखील प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने कर्जत नगर पालिकेने त्यात लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यासाठी हालचाली करण्याची मागणी जय अंबे रिक्षा संघटनेने केली आहे. त्याचवेळी एसटी वाहतूक या भागातून सुरू झाल्यास लोकल प्रवाशांना जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version