। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील कर्जत चारफाटा ते भिसेगाव या भागातील रस्त्याचे काम गेली अनेक महिने सुरू आहे. त्या रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून त्या कामाची पाहणी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.
कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. हा रस्ता व्हावा, अशी भिसेगावमधील नागरिकांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. याबाबत उपोषणही करण्यात आले होते. तांत्रिक कारणामुळे रस्त्याचे काम रखडले होते. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर एमएमआरडीए मुंबई यांच्यामार्फत कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी सुमारे पाच कोटी इतका निधी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्या अनुषंगाने रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
नगरपरिषद हद्दीत असलेल्या चारफाटा ते भिसेगाव या 600 मीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, त्याची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि शहर अभियंता मनीष गायकवाड यांनी केली.