। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील या दिघोडे विभात आणि कोप्रोली विभात गेल्या अनेक वर्षांपासून जेएनपीटीवर आधारित गोडाऊन उभारण्यात आली आहेत, त्याचबरोबरीने या रस्त्यालगत कंटेनर दुरूस्ती करणारे यार्ड असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली पाहावयास मिळत आहे. कधीही या मार्गाने प्रवास करायचा म्हटला तरी सर्व प्रथम आपल्याकडे प्रवासासाठी अधिकचा वेळ राखून ठेऊनच प्रवास करावा लागत असल्याचे सातत्याने प्रवास करणार्या प्रवाशांनी बोलताना सांगितले.
येथील स्थानिक लोकांना सततच्या होणार्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आसल्याने नाहक त्रास होत आहे. त्यामुळेच अनेकदा येथील रहिवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी उशीरानेच पोहोचावे लागत आहे. तसेच घरी परतताना वाहतूक कोंडीमुळे अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे.
कंठवली, वेश्वी आणि दिघोडे या गावांना लागून असणार्या या रस्त्यावरील काही माल हाताळणार्या गोदामांमुळे तर अधिकच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तीच गत येथील कोप्रोली विभागातील खोपटे, कोप्रोलीत ही होऊन बसली आहे. ज्यावेळी या भागात वाहतूक कोंडी होत असते, त्या-त्या वेळी आपल्या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांमार्फत स्वतःच्या गाड्या सोडून एक ही गाडी ऊभी राहू देत नाहीत. अंदाजे शंभर मीटरचा रस्ता हा खाली ठेवण्यात येतो. त्यामुळे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.