। नागोठणे । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन आणि ऑफलाईन पोस्टर स्पर्धेत नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ओ.एस. परमार डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागातील प्रतिक्षा जुईकर व शुभम गायकवाड यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत कॉलेजचे नावलौकिक वाढविले.
कांदिवली-मुंबई येथील ठाकूर पॉलिटेक्निक येथे दि. 24 मार्च रोजी संपन्न झालेल्या तंत्र उत्सव या राज्यस्तरीय आफलाईन पोस्टर स्पर्धेत भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमधील इलेक्ट्रिकल विभागाची कप्रतिक्षा यशवंत जुईकर व शुभम गायकवाड यांनी स्पर्धेतील अभियांत्रिकी आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित सर्वोत्तम पोस्टर काढून या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविला. या दोघांनाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याचबरोबर जालना जिल्ह्यातील अबंड येथील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असोसिएशन गव्हरमेंट पालीटेक्निक कॉलेजमध्ये अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 10 मार्च रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धेतही प्रतिक्षा जुईकर हिने स्वातंत्र्यानंतर भारतात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची वाढ या विषयावर आधारित पोस्टर काढले होते. या स्पर्धेतही प्रतिक्षाला तिसर्या क्रमांकाचे तीन हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान प्रतिक्षा हिची या राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धेत सर्वोत्तम 20 विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली होती.