। श्रीवर्धन । वार्ताहर ।
वावेदिवाळी केंद्राचे शाळा पूर्व तयारी अभियान प्रशिक्षण माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून माध्यमिक विद्यामंदिर रातवडचे मुख्याध्यापक महादेव जाधव, शृंगारी पाटील, वावेदिवाळी केंद्रप्रमुख अशोक काळे, ज्योती राशिनकर व छाया मोरे तसेच केंद्रातील सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सुरुवातीला दिपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले.प्रास्ताविकात अशोक काळे यांनी शाळापूर्व तयारी प्रशिक्षणाचे स्वरुप स्पष्ट केले. यावेळी ज्योती राशिनकर व छाया मोरे यांनी शाळा पुर्व तयारी प्रशिक्षणाची आवश्यकता सांगून विद्यार्थ्यांच्या विकास पत्राची सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सञात एकूण सात स्टाल्सची मांडणी केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी ताईंनी करुन जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणार्या विद्यार्थ्यांकडून सदर स्टाल्सवरील विविध कृती, खेळ घेतल्या व सदर विद्यार्थी व माता पालकांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहन दिले. शारीरिक विकास, बौध्दिक विकास, भावनात्मक विकास, भाषाविकास, गणन पूर्व तयारी, सामाजिक विकास अशाप्रकारच्या कृती, विविध खेळ व अक्टीव्हीटीचे स्टाल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांना या कृती व खेळ करताना आनंद मिळाला व त्यांचे शिक्षणही झाले. शेवटच्या स्टालवर माता पालकांचे अभिप्राय घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.