भिवपुरी स्टेशन रस्त्याची दुरुस्ती

। नेरळ । प्रतिनिधी ।
डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता.त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवासी यांना खड्डेमय रस्त्याने जावे लागत होते. दरम्यान, तेथील व्यावसायिकांनी दगड, खडी टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम केल्याबद्दल भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन प्रवासी संघाने आभार मानले आहे.

मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडे असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात डीकसळ गावातून येण्यासाठी रस्ता आहे. तो रस्ता उमरोली ग्रामपंचायतने तीन वर्षांपूर्वी रेल्वेची परवानगी घेऊन केला होता. या रस्त्यावरून गतवर्षी पावसाचे पाणी वाहून गेले होते. त्यामुळे रस्ता खराब झाला होता आणि त्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे वाहनांना वाहतूक करणे तसेच प्रवाशांना चालणे देखील कठीण झाले आहे. त्याबाबत भिवपुरी रोड रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेने खड्डेमय रस्त्याबाबत श्रमदान करून रस्ता सुस्थितीत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र तेथील व्यावसायिक शैलेश पटेल यांनी प्रवासी संघटनेची धावपळ पाहून दोन ट्रक दगड आणि खडी यांची व्यवस्था करून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली आहे.

Exit mobile version