भोनंगच्या पुलाला दुरुस्तीची प्रतीक्षा

रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

| रायगड | प्रमोद जाधव |

अलिबाग तालुक्यातील भोनंग, तळवली अशा अनेक गावांना जोडणारा भोनंग पूल सुमारे 45 वर्षे जूना आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. परिणामी हा पूल जीर्ण झाला आहे. या पुलाचे लोखंडी कठडे खराब झाले असून, संपूर्ण पुलाला गवत-झुडपाने विळखा घातला आहे. तसेच, पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या पुलाकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

अलिबाग-रोहा मार्गावरील फणसापूर गावापासून काही अंतरावर सुमारे 45 वर्षांपूर्वी भोनंगचा पूल बांधण्यात आला होता. या पुलामुळे, फणसापूर, बापळे, तळवली, भोनंग, भागवाडी, नवखार, कुदे, सुडकोली, ताजपूर आदी गावे, वाड्या जोडल्या गेल्या आहेत. या गावांतील नागरिकांसह विद्यार्थी व अन्य प्रवाशांना ये-जा करण्यास फायदा होत आहे. या पुलावरील रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतो. परंतु, या रस्त्याची अवस्था बिकट होत असताना पुलाची अवस्थादेखील दयनीय झाली आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील रामराज मार्गे प्रवास लांब पडत असल्याने या पुलावरून जाण्यास अधिक पसंती दिली जात आहे. अलिबाग-रोहा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या पुलावरील वाहतूक सोपी आणि कमी वेळेत पोहचण्यासारखी आहे. त्यामुळे या पुलावरून शेकडो वाहने धावत असतात. परंतु, या 45 हून अधिक वर्षे जून्या असलेल्या पुलाची दूरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग उदासीन ठरल्याचे चित्र दिसून आले आहे.

भोनंग पुलाच्या सुरुवातीपासून ते पुल संपेपर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले लोखंडी पोल खराब झाले आहेत. काही पोल तुटलेल्या अवस्थेत आहेत. पूलाच्या दुतर्फा गवत व झुडपाने विळखा घातला आहे. सध्या नवघर पुलावरून वाहतूक बंद केली आहे. परंतु, भोनंग पुलाची वेळेवर दुरुस्ती केल्यास हा पूल वाहतूकीसाठी फायदेशीर ठरणारा आहे. तसेच, रोहा-अलिबागला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहचता येणार आहे. याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

निधीचा प्रस्ताव लाल फितीत
रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणारे पुल व खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने शासनाकडे मागमी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून 16 कोटी रुपयांचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या अगोदर पाठविला आहे. परंतु, शासनाकडून रस्ते व पुल दूरुस्तीसाठी निधीच अद्याप उपलब्ध झालाच नाही. त्यामुळे हा प्रस्ताव लाल फितीत अडकून बसल्याची माहिती समोर येत आहे.

रस्त्यासह साकव दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. 16 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. निधी प्राप्त झाल्यावर तातडीने रस्ते, साकव दुरुस्त केले जातील.

– राहूल देवांग, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम

Exit mobile version