भोंदू बाबाला केले गजाआड

। पनवेल । वार्ताहर ।
जुने आजार धार्मिक विधीद्वारे बरे करून देतो असे सांगून महिला वर्गाकडून विधी व पूजा करण्याकरिता सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने काढून घेवून त्यानंतर त्या अदलाबदल करून दागिने व रोख रक्कम लंपास करणार्‍या एका भोंदू बाबास खारघर पोलिसांनी अटक केली आहे. खारघर वसाहतीमध्ये राहणार्‍या एका वृद्ध महिलेचा जुना आजार बरा करतो असे सांगून एका भोंदू बाबाने त्यांच्या घरी जावून त्यांना धार्मिक विधीसाठी त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या बांगड्या या बिछान्याखाली ठेवण्यास सांगितले व हातचलाखीने सदर बांगड्या काढून त्या ठिकाणी खोट्या बांगड्या ठेवल्या व एकूण 1 लाख 63 हजाराची फसवणूक करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करताच खारघर पोलीस पथकाने सदर आरोपीचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेवून अरफान खान (31 रा.नेरुळ) याला अटक केली आहे. याच्या अटकेमुळे अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version