कोटयवधींचे भूमिपूजन तरीही जनतेच्या आरोग्यासोबत खेळ

| पोलादपूर | वार्ताहर |

शहरातील नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये असलेल्या डॉ.आंबेडकर नगरातील ग्रामस्थांना नळपाणीपुरवठयावेळी शनिवारी कीडे व सांडपाणीमिश्रीत पाणीपुरवठा झाल्याने कोटयवधी रूपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन होऊनही जनतेच्या आरोग्यासोबत खेळ चालल्याबद्दल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाहणी करताना तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

शनिवारी दि. 20 जानेवारी 2024 रोजी पोलादपूर प्रभाग क्रमांक-2मधील डॉ.आंबेडकर नगरमध्ये पिण्याच्या नळवाहिनीमधून अतिशय खराब पाणी व किडे पाण्यामधून आले. तेव्हा स्थानिक नगरसेवक निखिल कापडेकर यांच्याकडे ग्रामस्थांनी धाव घेऊन परिस्थिती दाखवली. त्यानंतर सर्व नगरसेवक, शहरप्रमुख, शहर संघटक व विभाग प्रमुख एकत्र येऊन नगरपंचायतीमध्ये अधिकार्‍यांसमोर सदर पाण्याचा नमूना बाटली मधून सादर केला. त्यानंतर नगरपंचायतीमधील अधिकारी यांना घेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक व पदाधिकारी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी निघाले असता वार्ड क्रमांक 4 व 5 मध्ये चालू असलेल्या कोटयवधींच्या गटाराची पाहणी करताना डॉ.आंबेडकर नगरातील नागरिकांच्या नळपाईप योजनेतील सांडपाणी पाणी हे थेट नदीमध्ये वाहून जात असून पुढे नदीकिनारी असणारा पंपघरामधून हे पाणी पोलादपूर शहरातील सर्व साठवण टाकीत जमा होऊन शहराला पुरवठा होत आहे, असे निदर्शनास आले. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पोलादपूर शहरप्रमुख निलेश सुतार यांनी नगरपंचायतीचे सत्ताधारी पोलादपूरमधील जनतेच्या आरोग्यासोबत खेळ करत असून विकासाच्या मुद्दयावर गटारे संरक्षण भिंत अशी अनावश्यक कामे करून कोटयवधी रुपये खर्च दाखवित स्वत:चे खिसे भरण्याचे काम चालविले असल्याची टीका करून पण पोलादपूर शहरातील जनतेच्या आरोग्याशी होणारा हा खेळ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक कदापिही सहन करणार नाहीत, असा पवित्रा घेत या गटारांची कामे थांबवून जलशुध्दीकरण प्रकल्प जोपर्यंत होत नाही; तोपर्यंत या कामाला स्थगिती द्यावी, असे निवेदन नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनामध्ये पोलादपूर जनतेसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार होणार्‍या विकास कामासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमी पाठिंबा राहणार आहे; परंतु ज्या विकास कामांमध्ये जनतेच्या आरोग्य विषयक समस्यांचा गांभीर्याने विचार करून जलशुध्दीकरण प्रकल्प व सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प न आणल्यास आंदोलनाची भुमिकाही घेण्याचा इशारा यावेळी यांनी दिला.

यावेळी शहरप्रमुख निलेश सुतार यांच्यासोबत शहरसंघटक अमोल भुवड, विभागप्रमुख संतोष चिकणे, नगरसेवक स्वप्नील भुवड व निखिल कापडेकर, नगरसेविका श्रावणी शहा, सान्वी गायकवाड व तेजश्री गरुड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version