शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। उरण । वार्ताहर ।
आवरे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या समाज मंदिराचा भूमीपूजन सोहळा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते दसर्याच्या शुभमुहूर्तावर शनिवारी (दि.12) पार पडला.
यावेळी आ. जयंत पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये पुढच्या दसर्यापर्यंत उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.तसेच आवरे गावातील सावकाराकडील असलेली जमीन शेतकर्यांना परत मिळवून देऊ, असे सांगून आवरे गावातील शेतकर्यांनी दलालापासून सावध राहा, जमिनी विकू नका, असा मोलाचा सल्ला शेतकर्यांना दिला आहे.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख, माजी जि.प. सदस्य संतोष ठाकूर, काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य महेंद्र ठाकूर, माजी सभापती नरेश घरत, सागर कडू, समिधा म्हात्रे, आवरे गावचे माजी सरपंच भार्गव गावंड, निराबाई पाटील, प्रगती म्हात्रे तसेच मंदिराचे डिझाईन करणारे श्रीशैल गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल रखुमाई मंदिराचे उपाध्यक्ष संदीप गावंड यांनी केले. त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन कोणीही या कामात पक्षभेद न करता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी महेश गावंड, कौशिक ठाकूर, नित्यानंद म्हात्रे, मंदिराचे संस्थापक स्व. दत्ता पाटील यांचे नातू प्रवीण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंदिरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. जयंत पाटील यांच्याकडून हे काम मंजूर करण्यासाठी गावातील शेकापचे कार्यकर्ते संदीप गावंड, संजय गावंड, मनोज गावंड, प्रभाकर गावंड यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. मंदिराचे कमिटी अध्यक्ष संजय गावंड आणि खजिनदार अशोक पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गावंड यांनी केले, तर आभार संदेश गावंड यांनी केले.