रायगडच्या भूमीपुत्रांचा चित्रपटाच्या विश्‍वात बोलबाला

छ.संभाजी राजे यांच्या हस्ते हरिओमच्या पोस्टरचे अनावरण
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
छत्रपतींचे निष्ठावंत मावळे म्हणून तानाजी व सूर्याजी हे दोघे भाऊ कायम स्वराज्य रक्षणासाठी प्राणपणाने लढत राहिले. शूरवीर तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने युद्धभूमी सांभाळली. याच इतिहासाची व बंधुप्रेमाची पुनरावृत्ती करणारा संदेश हरिओम चित्रपटातून देण्यात आलाय.अन्याय अत्याचारावर प्रहार, भ्रष्टाचाराला मूठमाती, सुशिक्षित बरोजगारांना नवद्योजक बनण्याची प्रेरणा, मराठी माणसाचे हीत व दोन भावांचे बंधुप्रेम दाखविणारा दमदार असा हरिओम चित्रपट लवकरच प्रेक्षक रसिकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे रायगडच्या भूमी पुत्रांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे हरिओमचा चित्रपट विश्‍वात बोलबाला दिसून येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्र राज्यातील जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा व भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

छ. शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष न करता त्यांचा जनहितार्थ विचार मनामनात रुजविणे व आचरणात आणणे असा प्रेरक संदेश या चित्रपटातून देण्यात आलाय, या चित्रपटाचा प्रभाव युवापिढीसह आबाल वृद्धांवर पडेल असा विश्‍वास चित्रपटाचे अभिनेते हरिओम यांनी व्यक्त केला. छ. शिवाजी महाराज व छ.संभाजी राजांच्या आदर्श व प्रेरक विचारधारेवर आधारीत हरिओम चित्रपटाच्या प्रचार प्रसारासाठी वंदना मोरे राज्य दौर्‍यात सहभागी होऊन मराठी माणसाचा चित्रपट सुपरहिट करण्यासाठी पूर्ण कुटुंबासह हा चित्रपट पाहावा असे आवाहन देखील मोरे करीत आहेत. सदर चित्रपटात रायगडच्या ऐतिहासिक व क्रांतिकारी भूमीतून कलाकारांना अभिनयाची संधी देण्यात आलीय. या चित्रपटात अभिनेता ओम याने रियल हिरोची भूमिका बजावत तरुणांना निरोगी व सदृढ शरीरयष्टीचे महत्व पटवून दिले आहे.

मराठी माणसाला गर्व व अभिमान वाटेल अशा चित्रपटाची निर्मिती हरिओमच्या निमित्ताने झाल्याने मराठी चित्रपट विश्‍वाला एक नवी झळाळी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हरिओम चित्रपट आपण आपल्या कुटुंबियांसोबत देखील पाहू शकणार आहोत.चित्रपट प्रेमींना आकर्षित करणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित व्हावा याकडे सारेच डोळे लावून बसले आहेत.

Exit mobile version