पाण्यासाठी ग्रामस्थांच्या खिशाला भुर्दंड

| मुरूड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील यशवंतनगर-नांदगांव पंचक्रोशीतील बहुतांशी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या विविध योजनांच्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे दोन तीन दिवसांआड तास अर्धातास पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना भाग पडत आहे. तर काही ग्रामस्थांना बिसलेरी अथवा अन्य खाजगी फिल्टर केलेल्या पाण्यासह येथील खाजगी व पारंपरिक विहिरीतील पाणी अक्षरशः विकत घ्यावे लागते आहे.

येथील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून तीन विहिरी खोदण्यात आल्या आहेत. परंतु, या सर्व विहिरीतील पाण्याच्या पातळीने मार्च महिन्यातच तळ गाठला. त्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच येथे पाणी कपात करण्यात आली आहे. सद्या तर दोन दिवसांनी अर्धा ते एक तासभर पाणी सोडले जात आहे. तसेच, गावच्या काही भागात विहुर पाझर तलावातील पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतीने बसवलेल्या दोन फिल्टर द्वारे नांदगाव खालचा मोहल्ला व कोळीवाडा भागात धरणातील पाणी शुद्ध करुन नागरिकांना पुरवले जाते. परंतु, विस लिटर पाण्यासाठी त्यांना दहा रुपये खर्च करावे लागतात.

तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांना गावातील पारंपरिक विहिरीतील पाणी विस रुपये हंड्याने विकत घ्यावे लागत आहे. तर, अन्य वापरासाठी शंभर ते दोनशे रुपये दराने पाचशे लिटर पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांचा खर्च अन्य जिवनावश्यक वस्तूंबरोबरच आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील होत आहे. सद्याच्या वाढलेल्या तापमानाबरोबर जसजसा पावसाळा लांबेल तसतसा त्यांचा हजारोंचा खर्च हा पिण्याच्या पाण्यावर होणार आहे.

दरम्यान, केंद्राच्या व राज्याच्या जलजीवन मिशन व हर घर जल योजनांचे मोठ्या थाटात भूमीपूजनाचे सोहळे पार पडले आहेत. या योजनांच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याची कामे अनेक ठेकेदारानी अर्धवट ठेवून योजनेअंतर्गत तिस टक्के रक्कम उचलल्याचे वृत्त आहे. या योजनाही सद्या अस्तित्वात असलेल्या विहिरीतील पाण्यावरच अवलंबून असणार आहेत. केंद्राच्या योजनेसाठी येथील खारआंबोली धरणातील पाण्याचा पुरवठा अनेक ग्रामपंचायतींना करण्यात येणार असल्याचे कळते. सद्या या धरणातून पाण्याचा पुरवठा मुरुड शहरातील जनतेला केला जात आहे. याच धरणातील पाणी नजिकच्याच दिघी पोर्टलाही देण्यात येणार असून शिवाय धरणाच्या परिसरातील शेतीलाही पुरविण्यात येणार आहे. मात्र, धरणातील एकूण पाणीसाठा व या सर्व योजनांचा मेळ घालण्यासाठी सर्वांनाच अक्षरशः तारेवरचीच कसरत करावी लागणार आहे.

Exit mobile version