एकतर्फी प्रेमातून जाळल्या दुचाकी

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
म्हावळिंगे-गोवा येथील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून दोडामार्ग तालुक्यातील आयी परिसरात संबंधित मुलीच्या घरासमोरील दोन दुचाकी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी या तरूणाला अटक करण्यात आली असून, सचिन राजाराम गावकर (28) असे त्याचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी युवक सतत एका मुलीचा पाठलाग करायचा. ही मुलगी खासगी नोकरी करायची. तिच्या घरातल्यांना तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी करा नाही तर तुम्हाला मारणार, तुमच्या घराला आग लावणार, अशी धमकी द्यायचा.
एकेरात्री मुलगी व कुटुंबातील सदस्य जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान ती युवती आपल्याशी लग्न करत नाही, या रागात त्याने पडवीत लावलेल्या दोन दुचाकी पेटवून दिल्या. त्यात दोन्ही गाड्या जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. गाड्यांची आग प्लास्टिकच्या छप्पराला लागल्याने छप्पराचा काही भाग जळूनही नुकसान झाले.
याबाबत त्या मुलीने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी दिली.

Exit mobile version