26 हजार 182 गणेशमूर्तींचे विसर्जन
| अलिबाग | प्रतिनिधी |
दीड दिवस घराघरांत भक्तीचा, आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण करणाऱ्या गणरायाला मंगळवारी (दि. 15) सायंकाळी गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. डोळ्यांत पाणी, मनात हुरहूर आणि ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. रायगड जिल्ह्यात 26 हजार 182 गणेशमूर्तींचे तलाव, नदी, समुद्र व खाडीमध्ये विसर्जन करण्यात आले. भक्तिमय आणि भावनिक वातावरणात हा निरोप सोहळा पार पडला.
रायगड जिल्ह्यात घरोघरी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. पारंपरिक खालू बाजा, बेंजो तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत गणेशभक्तांनी बाप्पाचे स्वागत केले. गणरायाच्या स्वागताला पावसानेही हजेरी लावली. जिल्ह्यात मनोभावे पूजा-अर्चा करीत एक लाख पाच हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूजा, आरती घेण्यात आली. बाप्पाला आवडणारे मोदक घरोघरी करण्यात आले. भजनांसह गाण्यांचे कार्यक्रम दिवसभर घेण्यात आले. लहान मुलांसह ज्येष्ठ मंडळीही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.
फुलांसह रोषणाईने गणेशमूर्तीची आरास सजवत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दीड दिवस सेवा केल्यानंतर मंगळवारी दुपारपासून विसर्जनाची तयारी सुरू झाली. पूजा, आरती झाल्यानंतर डोक्यावर तसेच चारचाकी वाहनातून मूर्ती घेऊन बेंजोच्या वाद्यांसह भजन करीत गावागावांतून, वाड्यावस्त्यांतून मिरवणुका काढण्यात आल्या. विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर सामूहिक आरती घेण्यात आली. नदी व तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावांतील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली.
अलिबागसह काशीद, वरसोली, मुरूड, रेवदंडा, नागाव, थेरोंडो, किहाम नागाव, श्रीवर्धन अशा अनेक समुद्रकिनाऱ्यांवर 26 हजार 182 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 13 आणि घरगुती 25 हजार 169 गणेशमूर्तींचा समावेश होता. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करण्यात आला.
नगरपरिषदेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दीड दिवसांच्या गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी दाखल होणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी अलिबाग नगरपरिषदेने विशेष मेहनत घेतली. गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या वतीने समुद्रकिनारी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली. या कृत्रिम तलावात शंभरहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता कायम ठेवण्यासाठी कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविकांनी तलावातच मूर्ती विसर्जन करण्याला पसंती दर्शविली. समुद्रकिनारी पोलिसांचे मदत कक्ष, नगरपरिषदेचे स्वागत कक्ष आणि आरती स्थळ उभारण्यात आले. गर्दी टाळणे आणि स्वच्छता राखण्यासाठी निर्माल्य संकलन कलश ठेवण्यात आले होते. भाविकांनी फुले व इतर निर्माल्य कलशात टाकण्यावर भर दिला.
अलिबाग नगरपरिषदेतर्फे दीड दिवसांच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभाग घेऊन गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणाऱ्या भाविकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी दीड दिवस, पाच दिवस आणि अनंत चतुर्दशी मिळून 200 हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झाले होते. यावेळी हा आकडा नागरिकांच्या पर्यावरणप्रती जागरूकतेमधून वाढण्याचा विश्वास आहे. यावर्षी राबविण्यात आलेल्या कृत्रिम तलाव उपक्रमात सहभाग घेऊन पर्यावरणाच्या संरक्षणास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सागर साळुंखे
मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद







