श्रीवर्धन पोलिसांची मोठी कारवाई

4 गाई आणि 18 बैल आरोपीकडून हस्तगत

| श्रीवर्धन | वार्ताहर |

राज्यात गोवंशबंदीचा कायदा लागू होऊन सुध्दा गुरांची अनधिकृतपणे कत्तल करणार्‍यांना कायद्याचे कोणतेही भय न राहिल्याची घटना श्रीवर्धनमध्ये घडल्याचे दिसते. श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी येथील मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एका गुप्त खबर्‍याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती की, या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेली गुरे क्रूरतेने डांबून ठेवलेली आहेत. त्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून सदरच्या 4 गाई व 18 बैल ताब्यात घेऊन आरोपी अजमत रशीद नारकर याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आराठी परिसरामध्ये गुरांची कत्तल केली जाते. याची कुणकुण पोलिसांना लागली होती.

गुरे एका छोट्याशा गोठ्यामध्ये आखूड दोरखंडाने बांधून ठेवण्यात आली होती. त्यांची चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. आरोपीने त्या गुरांना क्रूरपणे वागणूक दिल्याचे यातून निष्पन्न होत आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील पोलीस कृष्णहरी बालाजी कदम यांनी फिर्याद दिल्यावरून ठाणे अंमलदार पी.एम. सुळके यांनी पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्याद दाखल करून घेतली आहे.

याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995, प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे हे करीत आहेत. श्रीवर्धन पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version