| रायगड | प्रतिनिधी |
सागरी कवच अभियानाअतंर्गत रायगड जिल्ह्यातील सर्वच नाक्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चाचपणी केली जात आहे. अशातच काही अतिउत्साही तरुणांना पोलिसांच्या नाकाबंदीला चकवा देत पळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पुणे येथील तरुणांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इतरांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी चालकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
म्हसळा येथील साई चेक पोस्ट व श्रीवर्धन तालुक्यातील आराठी येथेही सागरी कवच अभियानाअंतर्गत नाकाबंदी सुरु आहे. नाकाबंदी दरम्यान सणसवाडी (पुणे) येथील तरुण श्रीवर्धन शहराकडे येत असताना म्हसळा येथील साई चेक पोस्ट येथे पोलिसांनी गाडी थांबडण्यासाठी सांगितले होते. मात्र, चालकाने बॅरीकेट्ला धडक देत म्हसळा गावातून श्रीवर्धन तालुक्यातील आराठी येथे प्रवेश केला. आराठी येथेही सागरी कवच अभियाना अंतर्गत नाकाबंदी सुरु असल्याने पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही रस्त्यावरील बॅरीकेट गाडीने उडवत श्रीवर्धन शहरात प्रवेश केल्याने अखेरीस पोलिसांनी चालक सोमनाथ दरेकर वय 28 (रा.सणसवाडी,ता.शिरूर,जि.पुणे.) याला त्याच्या तीन मित्रांसह ताब्यात घेतले आहे.