ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई

| पुणे | प्रतिनिधी |
ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी कारवाई केली.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अंमली पदार्थ तयार करणाऱ्यांपासून ते ललित पाटीलला फरार होण्यास मदत करणाऱ्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. या ड्रग्ज रॅकेटमागील अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. मास्टरमाइंड अरविंद लोहारे, भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्यासह 11 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून यामध्ये आता ससून रुग्णालयातील डॉक्टरला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

याआधी, ललित पाटीलला येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी अटक केली. डॉ. संजय मरसाळे असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.

Exit mobile version