निनावी फोनने उडाली खळबळ
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगला उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. या फोन नंतर त्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व ठिकाणी रात्रभर शोध घेण्यात आला मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री 9 वाजता एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्या व्यक्तीने धमकी दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे, दहशतवादविरोधी पथक, रेल्वे पोलीस, बॉम्ब शोधक आणि विल्हेवाट पथकाला कळवण्यात आले. या सर्वांनी दादर, भायखळा, रेल्वे स्थानक आणि जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ बॉम्बचा शोध घेतला.