हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन
| शिमला | वृत्तसंस्था |
शिमल्यातील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अनधिकृत मशीद उभारल्या प्रकरणात हिंदू संघटना, स्थानिक हिंदू लोकांनी विरोध करत बुधवारी आंदोलन सुरू केलं. अनधिकृतपणे उभारलेली मशीद पाडण्याची मागणी होत आहे. हिंदू संघटनांनी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संजौली चौकात एकत्र येत मशिदीला घेराव घातला. त्यांनी आंदोलन करत अनधिकृत मशिदीला विरोध करत ती पाडण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनांनी आता या प्रकरणात सरकारला दोन दिवसांचं अल्टीमेटम दिलं आहे. त्याशिवाय बाहेरच्या राज्यातून विना वेरिफिकेशन येणार्या लोकांविरोधातदेखील हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. बाहेरुन येणार्या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे अशा बाहेरच्या लोकांमुळे या परिसरातील वातावरण खराब होत असल्याचंही आंदोलकांचं म्हणणं आहे.
शिमला महानगरपालिका आयुक्त भूपेंद्र अत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीसाठी केवळ एक मजली इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, अनधिकृतपणे तीन मजले उभारण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, वक्फ बोर्डलाही यात पक्षाकार करण्यात आलं आहे. या आंदोलनानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संजौलीसह आजूबाजूच्या परिसरात एक हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्देश 11 सप्टेंबर रोजी रात्री 12 पर्यंत लागू असणार आहेत. तसंच शाळा, सरकारी कार्यालयं, बाजार सुरू राहणार आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी मल्याणामध्ये हिंदी आणि मुस्लीम समुदायात झालेल्या वादानंतर हे प्रकरण पुढे आलं. असा आरोप करण्यात आला आहे, की मुस्लीम समाजातील एका व्यक्तीने एक स्थानिक दुकानदार यशपाल सिंगवर हल्ला झाला. यात त्या व्यक्तीला 14 टाके पडले. त्यानंतर आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केलाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती.