आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर
| पनवेल | वार्ताहर |
विकासाच्या किती बाता मारल्या तरी समाजात घडणार्या काही घटनांवरून आपण अजूनही किती विकासाच्यादृष्टीने मागे आहोत याचा प्रत्यय देणारी घटना पनवेलमध्ये घडली. आसूडगाव येथील एका गरोदर महिलेला चक्क हातगाडीवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ तिच्या पतीवर आली. रात्रीची वेळ असल्याने ना रिक्षा, टॅक्सी उपलब्ध झाली, ना प्रशासन मदतीला धावून आले. 108 रुग्ण्वाहिकेला संपर्क केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी प्रसूती वेदना असह्य झालेल्या त्या महिलेला हातगाडीवरुन रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रसूती झाली असून, बाळ आणि ती सुखरुप आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत आसूडगाव येथे डोंबार्याचा खेळ करून आपला उदरनिर्वाह करणार्या एका कुटुंबातील महिलेला मध्यरात्री प्रसूती वेदना जाणवू लागल्या. मात्र, रुग्णालयात जाण्यासाठी कोणतेही खासगी वाहन मिळत नव्हते. आशा सेविकेला याबाबत माहिती दिली. तिने रुग्णवाहिकेचा नंबर दिला. तो लावला तरी समोरुन कोणी प्रतिसाद दिला नाही. शेवटी हतबल झालेल्या कुटुंबाने चक्क मोटारसायकलला हातगाडी जोडली आणि तीन किलोमीटरवर असलेले नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय असा जीवघेणा प्रवास केला. तेथी डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केल्याने या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. पनवेलसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने राज्यासह स्थानिक आरोग्यसेवेचे पितळ उघडे पडले असून, नागरिकांकडून याबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.