| सिडनी | वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीसाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यांच्या अटी जाहीर केल्या आहेत. या अटी ग्रुप स्टेजच्या सामन्यांपेक्षा वेगळ्या आहेत.
उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पाऊस पडल्यास ज्या स्थितीत सामना होणार तेथून दुसर्या दिवशीची सुरुवात होईल. म्हणजेच, हा सामना नव्याने खेळवला जाणार नाही. दोन्ही संघांमध्ये 10-10 षटकांचा खेळ झाल्यास तो डकवर्थ-लुईस नियमानुसार ठरवला जाईल. आधी पावसामुळे सामना झाला नाही तर, किमान 5-5 षटकांचा खेळ झाल्यानंतरच डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे निर्णय घेतला जात होता.
उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसामुळे चेंडू टाकला गेला नाही तर, त्यांच्या गटात अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. गट टप्प्यात सर्वाधिक विजय मिळविणार्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. त्याचवेळी अंतिम सामन्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.