मलेशियातील मिस स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानची कन्या हर्षा विनोद शिंदे हिने मिस हेरिटेज इंडिया हा किताब पटकवला असून, तिला मलेशिया येथे होणार्या मिसेस व मीस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेत मिस गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या यशामुळे माथेरानचे नाव सातासमुद्रापलीकडे जाणार आहे.
14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत कौलालमपूर येथे होणारी स्पर्धाही मिस व मिसेस युनिव्हर्सप्रमाणेच असून, या स्पर्धेतील सादरीकरण मात्र वेगळे असते. भारतामध्ये यश मिळवल्यानंतर आता तरुणांची आयडॉल असलेल्या हर्षा भारतीय परंपरा घेऊन थेट आंतरराष्ट्रीय मंचावरती त्याचे सादरीकरण करणार असल्याने तिला समस्त माथेरानमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंगापूर येथील एका मोठ्या कंपनीचे प्रायोजकत्व प्राप्त असलेल्या या स्पर्धेसाठी मृणाल गायकवाड या भारताच्या संचालक म्हणून काम पाहात आहेत. स्पर्धेत जगभरातील जवळपास तीसहून अधिक देशातील स्पर्धक सहभागी होणार असून, त्यात प्रामुख्याने रशिया, चीन, जपान, युक्रेन, पाकिस्तान, न्यूझीलंडसारख्या प्रगत देशांचा ही समावेश आहे.