मालमत्ता लपवणे पडले महागात; तोडणकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायत सरपंचांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. निवडणुकीच्या अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात स्वतःच्या मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी दिवेआगरचे विद्यमान सरपंच विजय तोडणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीवर्धनचे महसूल नायब तहसीलदार यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दिवेआगर ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक एप्रिलमध्ये पार पडली असून, या निवडणुकीत विजय तोडणकर हे थेट जनतेतून सरपंचपदावर निवडून आले आहेत. दरम्यान, त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या व कुटुंबाच्या मालकीची स्थावर मालमत्ता जाणीवपूर्वक लपवली, अशी तक्रार ग्रामस्थ सिद्धेश कोसबे व महेश पिळणकर यांनी तहसील कार्यालयात दाखल केली होती. माणगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता क्रमांक 225 (फ्लॅट क्रमांक 8-201, श्री मानजी कॉम्प्लेक्स, उतेखोल) ही तोडणकर यांच्या नावे असतानाही ती शपथपत्रात दाखवण्यात आली नाही, असा दावा अर्जदारांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत अर्जदारांनी ही फसवणूक व भ्रष्ट आचार असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, सरपंच विजय तोडणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ती मालमत्ता आपली नसून, पत्नीच्या निधनामुळे वारसदार म्हणून नावावर आली असून त्याचा उल्लेख नजरचुकीने राहिला असावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, तक्रारदार हे त्यांचे राजकीय विरोधक असून, मागील निवडणुकीतील पराभवाच्या आणि विविध संस्थांमधील वर्चस्वासंदर्भातील वैमनस्यातून सूडबुद्धीने हा खोटा अर्ज दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तहसीलदार न्यायालयाला या प्रकरणाची अधिकारिता नसल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला होता.
प्रशासकीय कारवाई
दोन्ही बाजूंच्या सुनावणीनंतर आणि माणगाव नगरपरिषद व राज्य निवडणूक आयोगाकडून मागवलेल्या अहवालाची खात्री केल्यानंतर, प्रशासनाने संबंधित मालमत्ता तोडणकर यांच्या नावे असल्याचे स्पष्ट मानले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अखेर श्रीवर्धन महसूल नायब तहसीलदार मनोज माने यांनी सरपंच विजय तोडणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले आहेत.
दिवेआगर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेले विजय तोडणकर यांनी उमेदवारी अर्जावरील शपथपत्रात माणगाव येथील मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णयधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला असून, आता सरपंचांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर मागणी करणार आहोत.
सिद्धेश कोसबे,
ग्रामस्थ, दिवेआगर







