सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काकांच्या मुलांआधी वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा पहिला अधिकार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
सर्वोच्च न्यायालयाने एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचं इच्छापत्र नसेल तर त्याच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मृत व्यक्तींच्या भावंडांआधी मुलीचा असेल असं स्पष्ट केलं आहे. मृत व्यक्तीच्या पुतण्यांना संपत्ती देण्याऐवजी प्रथम आणि प्राधान्यक्रमाने वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार असतो, असं न्यायालयाने म्हटलंय. इतकच नाही तर न्यायालयाने हा नियम हिंदू उत्ताराधिकारी कायदा १९५६ लागू होण्याच्या आधी झालेल्या संपत्ती वाटपालाही हा नियम लागू होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकारी कायद्याअंतर्गत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर समान हक्काचा अधिकार देण्यात आल्याचं नमूद केलं. न्यायालयाने हा कायदा लागू होण्याआधी धार्मिक व्यवस्थेमध्ये सुद्धा महिलांना संपत्तीचा अधिकार होता, असंही म्हटलंय. यापूर्वीही अनेक प्रकरणामध्ये असेच निकाल देण्यात आल्याचं सांगत न्यायालयाने एकाद्या मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याची संपत्ती त्याच्या भावाच्या मुलांना देता येत नाही. त्या संपत्तीचा पहिला वारस मृत व्यक्तीची मुलगी असते. ही संपत्ती तिलाच देण्यात यावी. हा नियम मरण पावलेल्या व्यक्तीने स्वत: कमवलेल्या संपत्तीबरोबर वाटपानुसार मिळालेल्या संपत्तीलाही लागू होतो, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय.

Exit mobile version