कांदा व्यापाऱ्यांचा संपाचा निर्धार ठाम
व्यापाऱ्यांच्या संपामुळे लिलाव बंदच
| नाशिक | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आले आहे, दुसरीकडे कर्नाटक आणि व आंध्र प्रदेशातील कांद्यावर मात्र 40 टक्के निर्यात शुल्क नाही, असा दुजाभाव का? असा सवाल उपस्थित करत कांदा व्यापारी हे कदापि सहन करणार नाही. येत्या 26 सप्टेंबर रोजची पणन मंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष असून तोपर्यंत कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरूच राहील, अशी भूमिका कांदा व्यापारी संघटनेने घेतली आहे. या व्यापाऱ्यांच्या संपाच्या निर्धारामुळे भविष्यात कांदा सर्वसामान्यांना रडवणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकमध्ये कांदा व्यापारी असोसिएशनकडून बुधवारपासून बंदची हाक देण्यात आली असून पालकमंत्र्यांच्या बैठकींनंतरही तोडगा निघालेला नाही. अशातच काल या सर्व घडामोडींवर व्यापारी संघटनांनी बैठक घेत चर्चा केली. मात्र दोन-अडीच तास चाललेल्या या बैठकीतूनही निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याबाबत उदासीन असून निर्यातशुल्क वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे, तो कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेत जोपर्यंत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नाही, बंद असाच सुरु राहील असा एकमुखी निर्णय व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. अशात पालकमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. बुधवारपासून जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांतीलकांदा लिलाव बंद असून कांदा निर्यात शुल्क जोपर्यंत मागे घेतले जात नाही, तोपर्यंत लिलाव न करण्याची एकमुखी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाला नाही. त्यानंतर येवल्यात व्यापारी असोसिएशनने बैठक घेत चर्चा केली. पालकमंत्र्यांसह सर्वांच्या या बैठकीकडे लागल्या होत्या. मात्र सायंकाळी चार वाजेपासून पावणे सात वाजेपर्यंत बैठक चालली, यातून व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते आहे. येत्या 26 तारखेला मंत्रिमंडळ बैठकीत मागण्या मान्य झाल्या तर कांदा व्यापारी लिलावात सहभागी होतील, अन्यथा बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बंद कायम ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय
दरम्यान कांदा व्यापारी संघटनेकडून केंद्र सरकारने सुरू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क कमी करणे, यासह स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असलेले कर कमी करावे आदींसह वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन यापूर्वीच राज्य सरकारला पाठवले आहे, तसेच जिल्हा प्रशासना प्रशासनाला देखील दिले आहे. त्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत झालेल्या बैठकीवर बैठक झाली, मात्र या बैठकीतही तोडगा निघाला नाही. तसेच आता व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी होणे परवडत नसल्यामुळे व्यापारी कांदा लिलावात सहभागी झालेले नाही, अशी भूमिका कांदा व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समिती सुरू असल्याशिवाय तरीही व्यापारी सहभागी होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. या बैठकीमध्ये सुरू असलेल्या आंदोलन हे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काल झालेल्या कांदा व्यापारी संघटनेच्या बैठकीमध्ये हा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे