। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्याचे पाडकाम करण्यास सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राणेंकडूनच पाडकाम करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
जुहूमध्ये राणेंचा ८ मजली अधीश बंगल्यात अनाधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी राणेंना नोटिस पाठवण्यात आली होती. महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांच्या पथकाने २१ फेब्रुवारीला नारायण राणेंच्या जुहूतील अधीश बंगल्याची पाहणी केली होती. दोन तास पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अधीश बंगल्यात बांधकामावेळी एफएसआयचं उल्लंघन झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई हायकोर्टानंही अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही, असे सांगत हे बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता. तसेच नारायण राणे यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. तसंच, बांधकाम स्वतः पाडण्याचे आदेश दिले होते.
हायकोर्टाच्या आदेशानुसार राणेंकडून बंगल्याचे पाडकाम करण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळीच बंगल्यावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे.