| मुंबई | प्रतिनिधी |
“इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणे, या आरोपाखालील प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तो फरार होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. तेलंगाणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनाही धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली आहे. धमक्या दिल्यानंतर कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. मराठा राज्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर, कोरटकर नागपूरहून पळून गेला आणि चंद्रपूरमध्ये लपला. कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पुन्हा एकदा पळून जाण्यात यशस्वी झाला. महिनाभर पळून गेल्यानंतर त्याला तेलंगणामध्ये अटक करण्यात आली.
अटकेनंतर, कोल्हापूर पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर यांच्याविरुद्ध कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे अखेर त्याला अटक करण्यात आली. आता पुढे त्याच्यावर कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्याचा अटकेचा घटनाक्रम काय होता, याबाबत लवकरच माहिती समोर येईल. तर आता दुसरीकडे प्रशांत कोरटकरला अटक होताच राजकीय वातावरण तापलं आहे. यावर विरोधकांनी भाष्य केले आहे. प्रशांत कोरटकर हा पोलिसांना शरण आला असावा, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले आहे. तर अमोल मिटकरी यांनी प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.