पटवर्धनवाडी रस्त्याला तलावाचे स्वरूप

पावसाळा सुरू होऊनही दुर्लक्ष कायम

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी शहरालगतच्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, मुसळधार पावसामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. वाहनचालक, विशेषतः महिलांना या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत यांच्या हद्दीवरील हा महत्त्वाचा रस्ता दुरुस्त कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही रत्नागिरी नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायतीच्या एकाही अधिकारी किंवा सदस्याने रस्त्याची साधी पाहणीही केली नाही. सध्या रत्नागिरी नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने नागरिकांची आणखीनच कोंडी झाली आहे.

या रस्त्याची डागडुजी न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत या रस्त्याचा आणि गटारांचा प्रश्न मिटला नाही, तर आम्ही थेट पालकमंत्र्यांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version