विराटचा मोठा विक्रम! चक्क ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारला मागे टाकले

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात तर मोठे विक्रम करत असतोच, पण मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठे विक्रम आहेत. विराट केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे, हे नुकतेच दिसून आले आहे. विराट एक्स (ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने याबाबतीत ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरला मागे टाकले आहे. 35 वर्षीय विराटचे एक्सवर 63.5 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. नेमारचे एक्सवर 63.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. या यादीत पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे. त्याला 111.4 मिलियन फॉलोवर्स एक्सवर आहेत. दरम्यान, विराट सध्या टी वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत व्यस्त आहे. या स्पर्धेत विराटकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. त्याने या स्पर्धेपूर्वी नुकतेच खेळलेल्या आयपीएल 2024 स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्याने आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावाही केल्या होत्या.

Exit mobile version