बॉलिवूड किंग खानला मोठा धक्का; मन्नतवर एनसीबीचा छापा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा क्रुझ ड्रग्स पार्टीप्रकरणी अटकेत असलेला सुपुत्र आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धामेचा हिच्या न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष कोर्टानं आर्यन खानचा जामीन बुधवारी नामंजूर केला होता. त्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. आता आर्यनच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी 26 ऑक्टोबर सुनावणी होणार आहे.

बाप-लेकाची भेट
शाहरुख खान आणि आर्यन खान याची तब्बल तीन आठवड्यांनी भेट झाली. आर्यन गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. शाहरुख खाननं गुरुवारी थेट तुरुंगात जाऊन मुलाची भेट घेतली. बाप-लेकात फक्त 10 मिनिटे चर्चा झाली. आपल्या मुलाला गजाआड पाहून शाहरुख भावुक झाला होता. मात्र, आता आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यामुळे शाहरुख आणि गौरी खानला मोठा धक्का बसला आहे.

मन्नत’वर एनसीबी
आर्यन खानला अटक केल्यानंतर एकीकडे जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असताना, दुसरीकडे एनसीबी गुरुवारी शाहरुख खानच्या घरी मन्नतवर छापा टाकला. एनसीबीचे अधिकारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून, आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मोबाइल फोनमधील चॅटमधून महत्त्वाची माहिती लागल्यानंतर इतर गोष्टींमधूनही काही खुलासे होण्याची शक्यता एनसीबीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version