माणगावजवळ दुचाकीचा अपघात; एक जण ठार

| माणगाव | सलीम शेख |

माणगावपासून बारा किमी अंतरावर असणाऱ्या लाखपाले गावच्या हद्दीत मुंबई -गोवा महामार्गावर एका अज्ञात दुचाकीची धडक एका सुझुकी अँक्सीस दुचाकीला बसल्याने या अपघातात सुझुकी अँक्सीस दुचाकीवर मागे बसलेल्या २२ वर्षीय तरुणाचा म्रुत्यु झाला तर सुझुकीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. सदरील अपघात शनिवार दि.३१ डिसेंबर रोजी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघाताबाबत गोरेगाव पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महाड बाजुकडून माणगाव बाजुकडे जाणाऱ्या अज्ञात दुचाकीची लाखपाले गावच्या हद्दीत मुंबई बाजुकडून पोलादपूरकडे जाणाऱ्या सुझुकी अँक्सीस दुचाकीला धडक बसली. या अपघातात सुझुकी अँक्सीस दुचाकीवर मागे बसलेला तरुण परेश मुरलीधर नार्वेकर(वय-२२) रा. गोरेगाव प.मुंबई याचा म्रुत्यु झाला. तर सुझुकीचा चालक रोहित बबन पोटे (वय-२२) रा. गोरेगाव प.मुंबई हा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच टेमपाले येथील सामाजिक कार्यकर्ते मजिदभाई लोखंडे व गोरेगाव पोलिसांनी अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात आणले. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून सदर अपघाताचा अधिक तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.

Exit mobile version