माणगावजवळ दुचाकीला अपघात

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव-निजामपूर रस्त्यावर 2 किमी अंतरावर असणार्‍या खर्डी गावच्या हद्दीत गारवा हॉटेलजवळ भरधाव वेगाने येणार्‍या होंडा शाईन दुचाकीची समोरून येणार्‍या होंडा स्टनर दुचाकीला धडक लागून 2 जण जखमी झाले. सदरील अपघात शुक्रवार (दि.23) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहीती मोहन राठोड (30) रा. दत्तनगर ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

दीपक तेलंगे (43) रा. शिरसाड-माणगाव याने होंडा शाईन मोटारसायकल (एमएच-06-बीआर-6815) अतिवेगाने विरुद्ध दिशेला चालवून समोरून येणारी होंडा स्टनर मोटारसायकल (एमएच-06-बीसी-7332) या गाडीवरील चालक रोहिदास नथुराम पवार (55) रा. दत्तनगर-माणगाव यांना समोरून धडक दिली. या अपघातात रोहिदास पवार व त्यांच्या पाठीमागे बसलेला मल्हारी मोहिते हे दोघे जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Exit mobile version