| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पनवेल-मुंब्रा मार्गावर कळंबोली येथील स्टील मार्केट येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिल्याने एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रेलरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दहिसर मोरी येथे गालिब आजमी यांचे टायरचे दुकान आहे. गुरुवारी (दि.14) दुपारी आजमी पनवेल येथे काही कामानिमित्त आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतत असताना कळंबोली स्टील मार्केटमधील फुडलँड कंपनीजवळील रोडवर उभ्या असलेल्या ट्रेलरचा अंदाज आला नसल्याने त्यांच्या स्कुटीने ट्रेलरला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गालिब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरच ट्रेलर उभा केल्यामुळे याप्रकरणी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.