मोटारसायकल घसरून दुचाकीस्वाराचा मृत्यू

| पोलादपूर | वार्ताहर |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल घसरून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महाड तालुक्यातील शेलटोली येथील युवक कल्पेश राजू भिसे (22)हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन पोलादपूर येथून महाडच्या दिशेने जात असताना पार्ले गावाच्या हद्दीमध्ये ओव्हरब्रिजवर मोटारसायकल घसरून रस्तादुभाजकावर आदळल्याने त्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने तो जागीच मयत झाला. यावेळी रूग्णवाहिकेतून कल्पेशला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सलागरे आणि डॉ.प्रणीत जगदाळे यांनी कल्पेश मृत झाल्याचे तपासणीअंती घोषित केले.

या प्रकरणी संजय बाळकृष्ण उतेकर रा.तुर्भे खुर्द ता.पोलादपूर यांनी फिर्याद दिल्यानुसार पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद दखलपात्र गुन्हा र.नं.115-2023 नुसार करण्यात आली आहे. पोलीस हवालदार पवार हे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version