अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावनजीकच्या तळेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. सदरची घटना रविवार दि.10 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी तेजस म्हस्के यांचा चुलत भाऊ सूर्यकांत दगडू म्हस्के (25) रा.मुगवली-माणगाव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन लोणेरेकडून मुगवलीकडे जात असताना तळेगाव येथे आल्यावर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देऊन अपघात केला. या अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत म्हस्के याच्या डोक्यास, पायास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आर. डी. फाळके हे करीत आहेत.

Exit mobile version