| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी (दि.8) रात्री 8 ते 9 दरम्यान एका वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात वाहनाचा शोध तातडीने सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहारे पवारवाडी येथील शेतकरी बाबूराव भोसले हे मुंबई-गोवा महामार्गावरून त्यांच्या दुचाकीने शेताला पाणी सोडण्यासाठी जात होते. ते महानगर सीएनजी गॅस पंपानजिक आले असता त्यांच्या दुचाकीला एका वाहनाची जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बाबूराव भासेले हे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच, तातडीने मृतदेह पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहामध्ये पाठविण्यात आला. दरम्यान, या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांतील फूटेज तपासून तातडीने धडक देणाऱ्या वाहनाच्या शोधकार्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
