Smart Meters: स्मार्ट मीटरमुळे बिलाचा शॉक

अचानक दुप्पट-तिप्पट वाढल्याची तक्रार

| माणगाव | सलीम शेख |

महागाईच्या झळांनी आधीच होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज बिलाच्या वाढत्या आकड्यांनी अक्षरशः हादरवून सोडले आहे. राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू असताना अनेक ग्राहकांनी वीज बिल अचानक दुप्पट-तिप्पट वाढल्याची तक्रार केली आहे. घरातील वीज वापर पूर्वीइतकाच असतानाही हजारो रुपयांचे वाढीव बिल हातात पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महावितरणकडून “स्मार्ट मीटर अधिक अचूक आहेत” असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांना या बदलाचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. माणगावसह रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरांतून वाढीव वीज बिलाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे. काही ग्राहकांनी सांगितले की, पूर्वी 1000 ते 1500 रुपयांच्या दरम्यान येणारे वीजबिल आता थेट 3000 ते 4000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे घरात नवीन उपकरणे वापरात नसतानाही बिलात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. एका संतप्त ग्राहकाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आमचा वीज वापर पूर्वीसारखाच आहे. तरीही स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल अचानक वाढले. मग एवढ्या वर्षांपासून आम्ही चुकीचे बिल भरत होतो का?” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुने मीटर अनेकदा सदोष किंवा मंद गतीने चालत होते. त्यामुळे प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी बिल आकारले जात होते. स्मार्ट मीटरमुळे आता अचूक नोंद होत असल्याने बिल वाढल्याचे दिसत आहे. मात्र, ग्राहकांना हा युक्तिवाद मान्य नाही. कारण अनेकांच्या मते, जर जुनी यंत्रणा चुकीची होती तर त्याची जबाबदारी ग्राहकांवर का टाकली जात आहे? “मीटर बदलला आणि बिल वाढले” हा अनुभव इतक्या मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नागरिकांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. वीजबिल शून्यावर आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सोलर प्रणाली बसविणाऱ्या ग्राहकांनाही आता धक्का बसू लागला आहे.

प्रणालीत बदल, स्थिर आकार आणि इतर शुल्क वाढल्यामुळे सौर ऊर्जा वापरूनही अपेक्षित बचत होत नसल्याची तक्रार समोर आली आहे. पूर्वी “सोलर बसवा आणि वीजबिलातून मुक्त व्हा” असा विश्वास नागरिकांना देण्यात आला होता. मात्र, आता अनेकांना निश्चित शुल्क, कर आणि अतिरिक्त आकारणीमुळे पुन्हा वाढीव बिल भरावे लागत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य ग्राहकांना फक्त वापरलेल्या विजेचे पैसे भरावे लागतात, अशी धारणा असते. परंतु, प्रत्यक्षात वीजबिलामध्ये विविध प्रकारचे कर, स्थिर आकार, इंधन समायोजन आकार, वहन खर्च आणि इतर शुल्कांचा समावेश असतो. त्यामुळे कमी वापर असूनही बिलाचा आकडा मोठा दिसतो. स्थिर आकार, इंधन समायोजन आकार, वहन शुल्क, वीज कर व इतर अधिभार या शुल्कांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.

अनेक नागरिकांनी सरकार आणि महावितरणने स्मार्ट मीटर धोरणाचा फेरविचार करावा, वीजबिलातील अतिरिक्त आकारांबाबत पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी, अशी मागणी केली आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतरच बिल वाढ का? अतिरिक्त शुल्कांचा भार सामान्य ग्राहकांनीच का सहन करावा? सोलर बसवूनही अपेक्षित बचत का होत नाही? स्मार्ट मीटरची स्वतंत्र तांत्रिक तपासणी होणार का? वीज ही आजच्या काळातील मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे “अचूक मोजणी”च्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अन्याय होणार नाही ना, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.

वाढीव वीज बिलामुळे बजेट कोसळले
इलेक्ट्रिकल कंत्राटदार संघटनांनी काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर ग्राहकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ग्राहकांना पुरेशी माहिती न देता आणि तांत्रिक बाबी समजावून न सांगता मीटर बदलले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे प्रत्येक क्षणाचा वापर नोंदवला जातो. त्यामुळे विजेचा वापर अधिक बारकाईने मोजला जात असला, तरी त्याचा आर्थिक ताण सर्वसामान्यांवर वाढत चालला आहे. गॅस, पेट्रोल, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांच्या वाढत्या खर्चामुळे सामान्य माणूस आधीच त्रस्त आहे. त्यात आता वाढीव वीजबिलामुळे घरगुती बजेट कोसळत असल्याचे चित्र आहे. गरीब, मध्यमवर्गीय आणि सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.
Exit mobile version