पालिकेचे कोट्यवधी रूपये खड्ड्यात

| ठाणे | प्रतिनिधी |

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम विभागाने पालिका क्षेत्रातील जवळजवळ सगळ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केला असून रस्त्यावर डांबरीकरणाचा मुलामा टाकण्याचे काम करीत रस्त्यांची काही काळापुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पावसाने या रस्त्यांची दुरावस्था केली आहे. यामुळे हे डांबरीकरण निकृष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने खड्डे भरण्यासाठी आता नव्याने 22 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत दर्जा राखला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील प्रभाग क्षेत्रात रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. या रस्त्यांना दुरुस्तीनंतर तीन-चार महिन्यातच आता भगदाड पडले आहे. सर्वच परिसरात खड्ड्यांनी आता रस्त्यावर आपला ताबा मिळवल्याने वाहन चालकांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा अधिक धोका असून अपघाताची शक्यता आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत.

पालिका क्षेत्रातील एकही रस्ता सुस्थितीत नसून डांबरीकरणाने काही महिन्यापूर्वी नटवलेल्या रस्त्याचे स्वरूप उघडे पडल्याचे दिसून आले आहे. खासदार आमदार यांनी आपल्या दिलेल्या निधीतून बनविण्यात आलेल्या या रस्त्यांची पुरती वाट लागली असल्याने ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची साधी चौकशी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कमालीची संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version