काम न करताच लाखोंची बिले, साहित्य खरेदीचा अद्याप पत्ता नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर सध्या प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. मात्र, हा प्रशासकीय काळ म्हणजेच भ्रष्टाचाराला मोकळे रान दिल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहेत. विकासकामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदावरच कामे दाखवून लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा आरोप होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अक्षय हिसाळगे, महेश खारीक आणि रवींद्र मसणे यांनी प्रशासकीय राजवटीत शेलू ग्रामपंचायतीत पैशांची खुलेआम लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रशासक काळात साहित्य खरेदी दाखवण्यात आली असून, खरेदीला तीन महिने उलटूनही हे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचलेले नाही, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अक्षय हिसाळगे यांच्यासह ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामविकास अधिकारी आर.जी. म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती विचारली असता, अनेक ठिकाणी काम न करताच बिले काढल्याचे स्पष्ट झाले. काही कामांसाठी त्रयस्थ व्यक्तींच्या नावावर खोटी बिले काढण्यात आल्याचा आरोप अक्षय हिसाळगे यांनी केला.
याशिवाय ग्रामपंचायत हद्दीतील तलावाजवळ ओपन जिम उभारल्याचे बिल काढण्यात आले असून, प्रत्यक्षात जिमच्या साहित्याचा ठावठिकाणा नसल्याचे रवींद्र मसणे यांनी सांगितले. कचरा संकलनासाठी खरेदी करण्यात आलेली घंटागाडी ग्रामपंचायत आवारात सडून नादुरुस्त अवस्थेत उभी असून, आजपर्यंत तिचा एकदाही वापर करण्यात आलेला नाही, असे महेश खारीक यांनी स्पष्ट केले.
परिसरात सौरदिवे आणि एलईडी लाईट खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात हायमास्ट व दिव्यांचा पत्ताच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गटारे साफसफाईसाठी खर्च दाखवला असतानाही आजही गटारे तुंबलेलीच असल्याचे वास्तव समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायत हद्दीतील विविध कामांची बिले एकाच ठेकेदाराच्या नावावर काढण्यात आली असून, संबंधित ठेकेदारालाही याची माहिती नसेल, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अक्षय हिसाळगे आणि ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महेश खारीक, अक्षय हिसाळगे, रवींद्र मारुती मसणे, कल्पेश मसणे, तुषार मसणे, विक्रांत कुंभार, गणेश हिसाळगे, मनोज तरे, प्रसाद मसणे, गणेश तरे, आसिम मणियार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासकीय काळात सुरू असलेल्या शेलू ग्रामपंचायतीच्या अनागोंदी व संशयास्पद कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून, या प्रकरणाची चौकशी होणार का? आणि आरोप खरे ठरल्यास दोषींवर कठोर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







