| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. औद्योगिक क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या या ईटीपी प्रकल्पात सांडपाण्यावर योग्य प्रकारे केल्या जात असलेल्या प्रक्रियेमुळे औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या कासाडी नदीतील प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले असून, यामुळे नदीपात्रातील जैवविविधता वधारली आहे. परिणामी नदीपात्रात मासेमारी करणारे स्थानिक सुखावले असून, त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. यामुळे प्रदूषणाचा हा मुद्दा हरित लवादात देखील दाखल करण्यात आला आहे. प्रदूषणाबाबतीत वारंवार करण्यात येत असलेल्या तक्रारीनंतर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी प्रकल्पाची क्षमता काही वर्षांपूर्वी वाढवण्यात आली आहे. सीईटीपी प्रकल्पाच्या प्रक्रिया करण्याच्या वाढलेल्या क्षमतेमुळे वसाहतीतून वाहणाऱ्या कासाडी नदीतील प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे औद्योगिक वसाहतीतून वाहणाऱ्या कासाडी नदीतील जैवविविधता धोक्यात आल्याचा आरोप नेहमीच केला जातो. जवळपास 194 रासायनिक कारखाने असलेल्या या क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक वसाहतीत सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित आहे. 13 एम एल डी सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली असून, आता या प्रकल्पात जवळपास 27.5 एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार दररोज जवळपास 25.6 एमएलडी सांड पाण्यावर प्रक्रिया केली जात असून, प्रक्रिया केलेले हे पाणी कासाडी नदीतून वाघिवली पर्यंत टाकण्यात आलेल्या वाहिनीतून समुद्रात सोडण्यात येत असल्याने कासाडी नदीतील प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बाहेरून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषण
रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरती सीईटीपी प्रकल्पात योग्य रीतीने प्रक्रिया केली जात आहे मात्र त्याचवेळी काही कारखानदार आणि बाहेरून टँकरच्या मार्फत आणण्यात येणारे रासायनिक सांडपाणी नदीपात्रात परस्पर रित्या सोडण्यात येत असल्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण होत असल्याने अशा प्रकारे नियमबाह्य काम करणाऱ्या कारखान्यांवर आणि टँकर मालकांवर कारवाई करण्याची मागणी औद्योगिक वसाहतीतील कारखानदार करत आहेत.
सीईटीपी प्रकल्पात रासायनिक सांडपाण्यावर करण्यात येत असलेल्या प्रक्रियेनंतर बाहेर पडणारे सांडपाणी वाहिनी द्वारे वाघिवली येथील खाडीत सोडण्यात येत असल्याने कासाडी नदी काही प्रमाणात प्रदूषण मुक्त झाली आहे. याबाबत मच्छीमारी करणारे स्थानीक समाधान व्यक्त करत आहेत.
सुनील भोईर
स्थानिक