सुशोभीकरणामुळे नैसर्गिक सौंदर्याला बाधा; पाणवनस्पतींमुळे जैवविविधता धोक्यात
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल हे एकेकाळी तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. सध्या पनवेल फक्त एका तलावासाठी लोकांना माहिती आहे, ते म्हणजे बल्लाळेश्वर अथवा वडाळे तलाव. पनवेल महानगरपालिका झाल्यापासून आयुक्त तसेच राजकारण्यांना पनवेलमधील बल्लाळेश्वर तलाव एवढी एकच वस्तू सुशोभीकरणासाठी दिसत आहे. इतर तलाव मरणासन्न अवस्थेत असताना, येथील राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी बल्लाळेश्वर तलाव सुशोभीकरणावर प्रचंड जोर लावला आहे. हे सुशोभीकरण म्हणजे तलावाच्या नैसर्गीक सौंदर्याला बाधा करून त्याचे रूपांतर अनैसर्गिक पार्कमध्ये बदलण्याचा घाट घातला जात असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. तसेच, एवढे सुशोभीकरण करून देखील या तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यामुळे या तलावाला वाली कोण, असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
बल्लाळेश्वर (वडाळे) तलावात सध्या विदेशी पाणवनस्पती प्रचंड प्रमाणात पसरल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास लवकरच बल्लाळेश्वर तलाव मच्छर उत्पादन केंद्रात बदलेल आणि पनवेलच्या नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना बळी पडावे लागेल.त्यामुळे महानगरपालिकेने निवडलेल्या कॉन्ट्रॅक्टरला मोठी सुट्टी देण्यात आली आहे की काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे एकमेव जैवविविधता असलेला तलाव मृत करण्याच्या मागे हात धुवून लागलेली महानगरपालिका लवकरच या कामात यशस्वी होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या थंडीच्या आगमनाबरोबर बदके आणि इतर जातीच्या पक्षांनी तलाव परिसरात येण्याची उत्सुकता दाखवली आहे. परंतु, या विदेशी पाणवनस्पतींमुळे त्यांना स्वच्छंद भटकंती आणि खाद्य शोधण्यास अडचण येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हे एकमेव जिवंत तलाव शिल्लक राहिले असून याठिकाणी पावसाळी पाहुणे अगदी हक्काने भेट द्यायचे; परंतु, पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी यांना पनवेलच्या बल्लाळेश्वर तलावाच्या सद्यस्थितीबद्दल काहीच पडले नसल्याचे बोलले जात आहे. वारंवार सांगूनही विदेशी वनस्पतीची वाढ रोखण्यास पनवेल महानगर पालिका सपशेल अपयशी ठरल्याची नागरिकांमधून चर्चा होत आहे.
सततचा पाठ पुरवठा केल्यानंतरही अधिकारी पुढे काहीच हालचाल करत नाहीत. ते कॉन्ट्रॅक्टरला पुढे करून चालढकल करत आहेत. आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टरला भेटून स्व इच्छेने मदत करायला तयार आहोत. तसेच, कटेकर या अभियंत्यास भेटून तलावात कसे आणि कोणते जीव असावेत हे कळवले आहे. परंतु, गरज पडेल तशी सर्व मदत करण्याची तयारी दाखवून सुद्धा आत्तापर्यंत कुणीही संपर्क साधलेला नाही.
– सुदीप आठवले, अनुभूती संस्था







