महालक्ष्मी गोराई केंद्रावर प्रक्रिया
| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबई महापालिकेने कचरा मुक्त मुंबईसाठी महालक्ष्मी, गोराई या केंद्रावर कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, बायोगॅस अन् खत निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांवरून डंपिंग ग्राऊंडवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी होणार असून दुर्गंधीसारख्या समस्याही कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाला आहे. कचरा मुक्त मुंबईसाठी पालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच, 2030 पर्यंत कचरा मुक्त मुंबई हे उद्दीष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.
या पार्श्वभूमीवर आता महालक्ष्मी आणि गोराई कचरा स्थानांतरण केंद्रावर अद्ययावत पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. महालक्ष्मी येथे दररोज महालक्ष्मी केंद्रावर दररोज 625 मेट्रिक टन तर गोराई 350 मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.मुंबईतील 6 हजार मेट्रिक टनांच्या कचऱ्यापैकी सुमारे 2 हजार मेट्रिक टन कचरा हा सहा ठिकाणी असणाऱ्या कचरा हस्तांतरण केंद्रांवर छोट्या वाहनांमधून जमा केला जातो. यानंतर मोठ्या वाहनांमधून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन विल्हेवाट लावली जाते. मात्र वर्सोवा, गोराई, कुर्ला आणि महालक्ष्मी येथे असणाऱ्या कचरा हस्तांतरण केंद्रांच्या ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. शिवाय रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी कचरा पुनप्रक्रिया करणारी ङ्गआदर्श कचरा हस्तांतरण केंद्रफ बनवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दुर्गंधी कमी होणार हस्तांतरण केंद्रावर सुका कचरा, ओला कचरा असे विलगीकरण होईल. यानंतर प्लास्टिकच्या कचऱ्यापासून पायरोलेसिस तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून इंधन ऑइल तयार होणार आहे. शिवाय टाइल्स, पेव्हर ब्लॉक, विटा अशा वस्तू बनवल्या जातील. ओल्या कचऱ्यापासून खत आणि बायोगॅस प्रकल्प उभारले जातील. ही सर्व कामे कचरा हस्तांतरण केंद्र बंदिस्त करून केली जाणार आहे. त्यामुळे परिसरातील दुर्गंधी, रोगराईचा धोका टळण्यास मदत होणार आहे.






