उरणमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील शहरी भागात क्लिनिक आणि पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वैद्यकीय बायोमेडिकल कचरा ही मोठी समस्या आहे. क्लिनिक आणि पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा हा कचरा मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शासनाकडून काही संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्था ठराविक शुल्क घेऊन कचरा गोळा करून शासनाच्या नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावतात. मात्र, हे शुल्क वाचविण्यासाठी काही क्लिनिक, पॅथॉलॉजीधारक विविध ठिकाणी हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे समोर येत आहे.
उरण शहरातील चारफाटा येथील मच्छीमार्केटजवळ असा बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अशा रोगराईला आमंत्रण देणारे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या अशा क्लिनिक व पॅथॉलॉजी लॅबवर कठोर कारवाई करण्याची करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दवाखाने किंवा पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय जैविक कचरा उघड्यावर टाकता येत नाही. तसे केल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. हा कचरा पॅथॉलॉजी लॅबमधून निघालेला कचरा असून हा कचरा उघड्यावर टाकणे घातक आहे. तर यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
– डॉ. राजेंद्र इटकरे (तालुका आरोग्य अधिकारी)
