ठाण्यातील शहापूरमध्ये ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; सतर्कतेचा इशारा

तीनशेहून अधिक कोंबडय़ा, बदके दगावली
। मुंबई । वृत्तसंस्था ।
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधे ३०० हून अधिक देशी कोंबडय़ा आणि बदके गेल्या काही दिवसांत मृत पावली आहेत. या कोंबडय़ा आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली आहे. यामुळे सर्तक झालेल्या पशुसंवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटर परिघातील किमान १५ हजारांहून अधिक पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्यांतही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे का, याचा आढावा घेण्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले आहे. तर, बधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूची साथ पसरली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गटाने कोंबडय़ांचा किंवा इतर पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे आढळून आले तर नागरिकांनी त्याची माहिती तात्काळ पशू विभागाला देणे गरजेचे आहे.

Exit mobile version